हा खेळ बालपणीचा!

    लहानसा रुद्र (बिचकलात का? हे नाव आहे त्याचं) जेव्हा त्याची तीनं चाकी सायकल इवल्याशा पायने दणक्यात रेटत भिरभिरत फिरतो तेव्हा काॅलनीतील तमाम मोठी माणसे कौतुकाने बघत असतात. त्यातल्या त्यात जे सिनीयर सिटिझन्स आहेत त्यांच्या चेहऱ्यावर तर अपार सुख जाणवतं. सीटवर बसून त्याचे पाय खालची जमीन रेटु शकतात पण पायडल मारून सायकल पुढे धकवणे एवढं बळ त्या पायात अद्याप आलेलं नाही. वयाची अजुन अवघी दोन वर्षे सुद्धा पूर्ण झालेली नाहीत त्यामुळे त्या पायात जोर तरी किती असणार. निसर्गतः बागडण्या कडे लहान मुलांचा कल असतो. काॅलनीतील आतील रस्ते व आजुबाजुला रोजच झाडं-झुड होतं असते आणि मोजक्या लोकांची ये जा असल्याने त्याला मनसोक्त हा आनंद लुटता येतो. भीतीही वाटत नाही आणि पायात काटे बोचत नाहीत. साधारण एक ते दोन या वयाची मुले टोडलर्स या प्रकारात मोडतात. 
    या वयात हि मुले फार सुंदर आणि मोहक दिसतात. डोक मोठ पण त्यामानाने धड लहान, केस दाट म्हणण्याएवढे आलेले. हातपाय गोंडस, बोबड बोलणं, कान तीक्ष्ण. तुम्ही फक्त 'चाॅकलेट' शब्द अस्पष्टपणे उच्चारा! लगेच मान तुमच्या दिशेने वळेल आणि टपोरे डोळे तुमच्यावर रोखले जातील!. तुम्ही जर "सुपर मारीयो" पाहीला, म्हणजे खेळला असाल कधीतरी संगणकावर, तर डिट्टो त्याच्या सारखाच अवतार. चपळाई तशीच. शिवाय त्यांची नवीन शिकण्याची आवड शिगेला पोहोचलेली असते. आपले आईवडिल किंवा बहीण भावंडांच्या पलीकडे जग आहे हे कळण्याइतपत शहाणपणा त्यांना आलेला असतो. निदान आपल्याला तसं वाटत किंवा ते तसं भासवतात. बाहेरची एकंदरीत सगळीच दुनिया फिदा असल्याने रागावणार कोण?. झालंच तर कौतुकच होणार. त्यामुळे आजुबाजूचे जग हे आपल्या स्वतःच्या घराचं एक्स्टेंशन आहे अशी त्यांची धारणा होते. आपण उगीच घरात रमण्यात अर्थ नाही अशी समजूत करून घेतली जाते.
    टोडलर्स हा प्रकार माणसाच्या लहान मुलांचाच नाही तर कुत्रा किंवा मांजर यांची पिल्ले विशिष्ट वयात मोहक दिसतात. फार काय डिस्कवरी किंवा तत्सम चॅनल वर वाघ-सिहांची आणि इतर वन्य प्राण्यांची गोंडस पिल्ले पाहायला मिळतात. या वयात एकाच वेळी गोंडसपणा, खोडकरपणा, चातुर्य, हुशारी आणि अझान अशा अनेक गोष्टींचा सम्मुच्चय एका ठिकाणी पाहायला मिळतो. मी असं वाचलं आहे कि आपले पुर्वज, म्हणजे माकडे आणि त्यांच्या मध्ये सुद्धा चिपाझी सारख्या लेटेस्ट अपडेट. यावरून एक किस्सा आठवला. 
     चंदु आपल्या वडिलांना विचारता झाला "बाबा आपले पुर्वज माकडे होती का हो?"
     बाबा: "तुला कोणी सांगितलं?" (हे सीक्रेट?)
     चंदु:'"तो शेजारचा रमेश म्हणत होता!"
     बाबा: "त्याला सांग, तुमचे असतील, अमचे नाहीत!"
केवढे हजरजबाबी होते चंदुचे बाबा!, त्यांना डार्विनचा सिद्धांत मान्य नसावा.असो.
तर सांगायची गोष्ट अशी की ह्या माकडांच्या बाळाची आणि मानवी बाळाची बुद्धी यांची वाढ दिड वर्षांपर्यंत सारखीच असते. पण त्यानंतर मानवी बाळं खूप हुशार होत जातं. पहा काय चमत्कार आहे निसर्गाचा. मी मागे, म्हणजे सुमारे तीस वर्षांपूर्वी, रसेल नावाच्या संगणक लेखकाने लिहिलेल artificial Intelligence (AI) वरचं पुस्तक वाचलं होतं. आता chatGPT वगैरेमुळे AI सारखे शब्द लोक विड्याच्या पानासारखे चघळतांना दिसतात. अर्थात, आजकाल विड्याची पानेच कोणी फारसे चघळत नाहीत, असं मला वाटतं, असो, तर या पुस्तकात लिहिलेले एक वाक्य प्रकर्षाने आठवतं. "तुम्ही बुद्धीबळ खेळणारे, वैद्यकीय निदान करणारे, कायदा सल्लागार किंवा आर्थिक सल्लागार अशा सारखी कामं करणारे संगणक निर्माण करु शकता. असे संगणक मानवालाही या बाबतीत एक दिवस मात देतील." आणि तसं बहुतांश खरं ठरलं आहे. "परंतु निरागसपणे अनोळखी व्यक्तीला पाहून हसणार मुले simulate करणं जास्त अवघड आहे." तेव्हा तुम्हाला जेव्हा लहान मुलं दिसतील तेव्हा ते कोणाच, कोणत्या जातीचे किंवा धर्माचे असले फडतुस विचार मनात न आणता ते एक मानवी मुलं आहे, निसर्गाचा तो चमत्कार आहे अशा दृष्टीने त्याकडे पहा. बहुतेक तर असं होतांनाच दिसत. म्हणजे मोठी माणसे अद्याप तेवढी शहाणी आहेत असे मी समजतो.
    जर एखाद्या लहान बाळाला मोठा भाऊ किंवा बहीण असेल, जी गोष्ट आजकाल विरळ होत चालली आहे, तर ती मुलं लवकर शिकतात असा अनुभव आहे. अनुकरण करणे अशा वेळी जास्त सोप असावं. चार महिन्यांच मुलं पालथं पडायला सुरुवात करतं, आणि एकदाका मान सभाळता आली की पुढे पुढे सरकत रांगायला सुरुवात करतं. एका जागी स्वस्थ बसून आराम करण त्यांना नकोस होतं. पुढे तरुणपणी आणि प्रोढपणी हीच मुले अशी का वागतात कळत नाही. म्हणजे पुढे पुढे ती आराम करायला का सोकावतात कळत नाही. बालपणी मात्र 'स्वस्थ बसे तोचि फसे' या कवितेच्या ओळी त्यांना साद घालत असतात. थोडं मोठीं झाल्यावर हि मुले दोन पायांवर उभं राहायला शिकतात. तरीही तरुण वयातील मुलांना आईबाप पदोपदी "आधी स्वतःच्या पायावर उभं राहायला शिका!" असं का बजावतात याच कधीकधी आश्चर्य वाटतं. जाऊदे. मुलंमुली उभं राहायला शिकतात तेव्हा "मुन्ना उभा राहिला कोणी नाही पाहिला" असे कौतुकाने त्या उभ्या असलेल्या बाळाकडे बघत आईबाप म्हणत असतात. काही 'बाळं' हे कौतुक एवढं मनांवर घेतात की पुढे मोठेपणी, चक्क ऐंशी पार वय झालं असलं तरी, कुठे ना कुठे 'उभं' राहण्याचा पराक्रम करत असतात. एवढंच नाही तर त्याही वयांत कधीकधी चक्क 'पडतात'. प्रत्येकाची आवड! दुसरं काय?  एकदा उभं राहायला आले की पुढचा टप्पा 'चाल चाल' करण्याचा. दोन अडीच फुटावर आपल्या बाळाकडे हात पसरून
"आला रे! आला रे! आला रे!" किंवा "आली रे! आलीं रे! आलीं रे" असे म्हणणारे आईबाप याची साक्ष देतात. असं नुकतंच चालायला शिकलेलं मुलं आपल्या आईला (किंवा बापाला!) बायपास करून थेट पुढे जाऊन थेंब थेंब पाणी वाहत असलेली नळाची तोटी बंद करत अशी एक जाहिरात टीव्हीवर दाखविली जायची. ते मुलं सांगतंय पाणी वाचवा! जाहिरात बनविणाऱ्याच्या कल्पकतेला दाद दिली पाहिजे. तर मुलं चालायला शिकतात. इथं पुन्हा एक किस्सा आठवतो.
    पुर्वी कथा कादंबरी, नाटक, सिनेमा, सीरियल अशांतुन 'प्राध्यापक" असा पेशा असणारी व्यक्ती ही नेहमी विसरभोळी आणि आपल्याच विश्वात तल्लीन असलेली दाखवली जायची.किंवा ती असतही असतील तशी. खरं काय ते परमेश्वर किंवा ते प्राध्यापक जाणोत. अर्थात, इथे प्राध्यापक असं म्हटलं म्हणून सर, मास्तर, हेडमास्तर, लेक्चरर किंवा अगदी प्रिन्सिपॉल अशा सम-व्यवसायिकांनी आपलं अंग चोरण्याच काहीच कारण नाही. तर असे एक प्राध्यापक दुरगावावरून आपल्या कामावरून घरी परतल्यावर त्याची बायको लाडाने त्यांना सांगते ('कामावरून' हा शब्द खटकतोय कारण तो अंग मेहनत सुचवतो!)
"अहो! एकलं का? आपला बाळं किनई चालायला लागला!"
"असं? केव्हा पासून?" प्राध्यापक महाशय.
"केव्हापासून काय म्हणता? दोन दिवस झालेत फक्त!" बाळाची आई कौतुकाने
"अरे बापरे! म्हणजे एव्हाना तो खूप दुर गेला असेल!"
हा प्राध्यापक बहुतेक भौतिकशास्त्र शिकवत असावा!
एकदा मुलं चालू लागली की तिथेच थांबली तर ती लहान मुलं कसली? ती धावायला शिकतात. रुद्र माझ्या घरासमोरुन कधीच चालत जात नाही. एक तर तो तिचाकी खीचतो नाहीतर दौडत जातो. तो सगळ्यांना चेहऱ्याने ओळखत असावा. पण नांव लक्षात ठेवण्याजोग तो मोठा नाही. त्याची मोरणकर काका-काकुंशी खूप मैत्री आहे. तो एकदा मोरणकर काकांच्या घरावरून पळत चालला असताना काकुनी त्याला "कुठे चालला रे" असे विचारले. त्याने पळता पळताच आपल्या तुटक्या मुटक्या भाषेत " मी मोरणकर काकुकडे चालोय!" असं मोरणकर काकुलाच सांगितले. एकदा मी फिरायला जात असताना रुद्रनी "मला चाॅकलेट पाहिजे" असे विचारले" मला ते चांगलेच उमजले तरी मी त्याला "काय?", "काय?" असं पुन्हा पुन्हा विचारले. त्यावेळी जवळ उभा असलेला चिंटू मला म्हणाला की "तो तुम्हाला चाॅकलेट मागतोय". हा चिंटू रुद्रचा मित्र, परंतु दोन महिने सीनिअर! त्याला मला रुद्र काय मागतोय ते समजावुन सांगण्याचा उद्देश तुम्हाला कळलाच असेल. मी रुद्रला एक चाॅकलेट दिलं तर मी चिंटूलाही एखादं देईन हे त्याचं तर्कशास्त्र! लहान वयात बुद्धीमत्ता किती वेगाने वाढत असते ते यावरून दिसून येतं. 
मित्रांनो तुम्हाला लहान मुलं आवडत असतीलच. त्यांच्याशी प्रेमाने वागा! उद्या हे जग तेच पुढे नेणार आहेत.
-मिलींद नातु 

Comments

Popular posts from this blog

जोरका धक्का? नाही, भाऊचा धक्का

My US Visa Experience