जोरका धक्का? नाही, भाऊचा धक्का

 ही साधारण १९८८-८९ मधील गोष्ट आहे. गोष्ट नाही तर प्रत्यक्षात घडलेली हकीकत आहे. त्यावेळी मी ट्रेनिंगवर होतो नाशिक येथे. आणि त्यात उरणमध्ये गॅस टर्बाइनवर आधारित वीज निर्मिती केंद्र पाहायचं होतं. आम्ही सगळे दादर येथील विश्रामगृहात रहात होतो. ट्रेनिंगचा कालावधी तीन चार दिवसांचा होता.

 पहिल्या दिवशी आम्ही आधी लोकलने आणि नंतर सिटी बस मध्ये प्रवास करत उरणमध्ये पोहचलो. तेथे विद्युत केंद्राला भेट दिली आणि बरंच काही समजावुन घेतल. दुपारी जेवायला विद्युत केंद्रातील कर्मचारी वसाहतीत आलो. आमच्या प्रशिक्षकांनी सांगितले की येथे हा एक गाळा रिकामा आहे म्हणून आपण इथे उतरलो आहोत व कोणाला जर रात्री मुक्काम करायचा असेल तर ते थांबु शकतात. कारण दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रशिक्षण होतं. तसंच दादरला जाणं येणं त्रासदायक आणि वेळखाऊ होतं. आम्ही जेवणं करून थोडं त्या ठिकाणी आराम करून पुन्हा विद्युत केंद्राला भेट देण्यासाठी जाणार होतो. दरम्यान आमच्या हे लक्षात आले की त्या ठिकाणी खूप मच्छर चावत होते. एक तर समुद्रातील खाडी, दलदल, झुडपे माजलेली त्यामुळे डासं खूप होते. या ठिकाणी कार्यरत असलेले लोक कसे राहात असतील हा विचार मनात येत होता. जर कधी काळी आपली या ठिकाणी बदली झाली तर काय? हा प्रश्न सतावत होता. आमच्या पैकी कोणीही रात्री मुक्कामाला तिथे न राहता दादरहून येणं जाणं पसंत केले. त्या दिवशीचे प्रशिक्षण आटपून आम्ही पुन्हा वेग वेगळ्या बस आणि लोकलने दादरला पोहचलो. खूप वेळ लागतो, त्याकाळात तीन चार तास लागले. विश्राम गृह एका गुरुद्वाराच्या हद्दीत असल्याने दरवाजा बंद होता. कसे तरी वाॅचमनला विनंती करुन आत प्रवेश केला. अर्थात या सर्व गोष्टींची आधी कल्पना होती त्यामुळे वाटतेच जेवण करून घेतलं होतं. आमचे तीन चार ग्रुप होते. मी, शिवरतन, सुधीर, जाधव आम्ही लवकर पोहचलो. त्यामानाने मुळे, अनिल, चव्हाण हे थोडे उशिरा, तर सगळ्यात शेवटी ख्वाजा, मापारा, सुनील विश्रामगृहात दाखल झाले. ख्वाजा मला म्हणाला "अरे तुम लोग तो हमारे बादमे निकले थे! फिर हमारे पहले कैसे पोहचे? क्या जुगाड किया?"

"कुछ भी तो नहीं" मी आपसूकच उत्तर दिले.

 नंतर आपापल्या खोलीत जाऊन थोड्या ग्रुपमध्ये गप्पा मारल्या आणि झोपलो. दुसऱ्या दिवशी पुन्हा जायचं होतंच. 

 दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रशिक्षण आटपून आम्ही चार सव्वा चारच्या सुमारास परत यायला निघालो. आम्ही म्हणजे मी, शिवरतन, सुधीर आणि जाधव. फिरत फिरत बस स्थानक परिसरात जात असताना आम्हाला असे लक्षात आले की तेथुन जवळच थेट भाऊच्या धक्क्यावर जाण्यासाठी बोट मिळते. मग पुढे दादरला जाणं सोपं होतं. आम्ही तिकीट काढून बोटीवर चढलो. बोट फारचं लवकर भाऊच्या धक्क्यावर पोहचली. बोटीला फक्त अर्धा तास लागला. समुद्र सफर फार सुंदर वाटली. शिवरतन बोटीच्या मध्यभागी असलेल्या एका खोलीच्या टप्पावर बसला होता. आम्ही दादरला लवकर पोहचलो. यावेळी फक्त ख्वाजाच नाही तर इतरांनाही नवल वाटले. आम्ही इतरांपेक्षा दोन अडीच तास लवकर पोहचलो होतो. तिसऱ्या दिवशीही पुन्हा तेच करायचं हे आम्ही नक्की केले पण आम्ही कोणता जुगाड केला हे मात्र कोणालाही कळू दिलं नाही.

 तिसऱ्या दिवशीही परत येताना आम्ही बोटीत बसलो. आज थोडा उशीर झाला होता आणि बोट भरली होती त्यामुळे शिवरतनला वर बसता आले नाही. आम्ही चौघे बोटीच्या काठाला लागुन जे लाकडी बेंच होते त्यावर दोघं दोघं असं एकमेकांसमोर गप्पा मारत बसलो. बोटीवर साधारण दिडशे ते दोनशे प्रवासी बसतं असावेत. बोटीच्या कडेवरुन समुद्रातील पाणी सहज बसल्या जागी हात लावता येईल इतकं जवळ वाटत होतं. आजही कालच्या सारखीच मज्जा येत होती. बोटीने उरण सोडून दहा मिनिटे झाली होती. आज जरा उशीर झाला असल्यामुळे आणि थोडं ढगाळ वातावरणामुळे काळोख दाटून येतोय आसं वाटलं. आज लाटा जरा जास्तच होत्या. लवकर पोहचलो तर बरं असं वाटु लागलं. आता लाटा जरा जास्तच जोराने येत होत्या आणि अंधारही वाढत चालला होता. परंतु अजूनही संधिप्रकाश होता आणि दुरवर एक भले मोठे जहाज दिसत होते. काल आम्ही हेच जहाज बघितले होते. इतक्या मोठ्या महासागरात एखाद्या बहुमजली इमारती प्रमाणे ती एक स्थिर वास्तु असल्यासारखी दिसत होती. आम्ही यांवर काल चर्चा सुद्धा केली होती. बहुतेक विक्रांत असावी असा कयास होता. देवाला माहीत नक्की कोणतं जहाज होतं ते.

 थोड्या वेळाने लाटा फार जोराने येऊं लागल्या आणि बोटही डोलायला लागली. परंतु गप्पा गोष्टी चालूच होत्या. आम्ही चौघे तरुण असल्याने हास्य विनोद जास्तच होते. बोटीवर बहुतेक व्यापारी वर्ग तसेच काही स्त्रिया होत्या. आता बोटं खाडीच्या मध्यभागी आली असावी.

लाटा खूप जोराने येऊं लागल्या आणि बोटही जोराने हलु लागली. आता आम्हाला थोडी भीतीही वाटत होती. लवकर पोहचलो म्हणजे झालं. परंतु काही वेळ असाच गेला. मला वाटलं की आम्ही चौघे बोटीतून सहसा प्रवास करत नसल्याने आम्हाला भीती वाटत असावी. परंतु लाटा वाढत होत्या. आता तर नेहमी प्रवास करणारे बाया बापडे थोडेसे जास्तच शांत वाटु लागले. दुरवर विक्रांत अजूनही स्थिर परंतु अंधुक दिसत होते. केव्हा एकदा किनारा लागतोय असे झाले. पाणी अंधारामुळे काळपट निळ्या रंगाचे भासत होते. दुरवर दृष्टीच्या टप्प्यात पाणी, पाणी आणि फक्त पाणी. अपवाद विक्रांत! त्यावर तर आता दिवे सुद्धा चमकत होते. सर्व काही सुरळीत पार पाडावे म्हणून बहुतेक सारे मनात विचार करत असावेत. परंतु कधीकधी जसं हवं त्यांच्या नेमकं विपरीत घडतं. अचानक आकाशात ढग दाटून आले. होता नव्हता तो चंद्र प्रकाश नाहीसा झाला. वेळ मात्र फार झाला नव्हता. साधारण साडेसहा सात वाजले असतील. लाटा खूपच जोराने धक्का देत होत्या. बोट अक्षरशः हिंदकळत होती. आता बोटीवरील स्त्रिया गांगरल्या होत्या. काहींची लहान पोरं त्यांच्या आईला बिलगुन रडु लागली. काही स्त्रिया आणि माणसं देखील कावरीबावरी झाली. भरीस भर म्हणून हलकासा पाऊस सुरू झाला. आता मात्र फार भीती वाटत होती. एवढ्यात बोटीला मोठ्या लाटा धडकल्या. बोट कलंडते की काय असे वाटु लागले. मी आणि सुधीर एकमेकांसमोर समुद्राकडील बाजूला तर जाधव आणि शिवरतन अनुक्रमे आमच्या बाकावर आतल्या बाजूला बसून होते. आम्ही आपसात एक हात घट्ट धरून ठेवला तर दुसरीकडे बोटीला धरले. एक लाट खूप जोराने आलीं बोट आडवी होऊन सरळ झाली. आम्ही तर समुद्राच्या पाण्याला समांतर बोटीला धरून कसेबसे बसुन राहिलो. बोटीत थोड पाणी आत शिरलं. आता सर्वजण भयभीत झाले होते. बोटीवरील नियमित प्रवास करणारे, म्हणजे कोळी बांधव आणि गुजराती व्यापारी तसचे त्यांच्या बरोबर असलेल्या बाया बापडे पार घाबरलेले दिसत होते. मात्र बोट चालवणारे आणि त्यांचे सहकारी मात्र फारसे विचलित झाले नव्हते. तेवढ्यात एक जोरदार लाट आली आणि ती ओसरते न ओसरते तोच अजून एक प्रचंड लाट आली. हि लाट एवढी मोठी होती की बोट चक्क एका कुशीवर उभीं झाली. लोक कसे तरी पकडून बसुन होते. परंतु एक असतं की हि स्थिती फार वेळ तशाच प्रकारे राहात नाही तर बोट दुसरीकडे, म्हणजे विरुद्ध दिशेने दुसऱ्या कुशीवर कलंडते. हा झोका एवढा जबरदस्त होता की त्यामुळे बोटीच्या मध्यभागी असलेल्या त्या खोलीतील माळ्यावर ठेवलेले चहा साखरेचे डबे फरशीवर पडले. दुध सांडले. डबे पडताना झालेला आवाज करुण वाटला. हा प्रसंग बहुतेक सामन्य नसावा. कारण या धक्क्यानंतर बोटीवरील कर्मचारी ओरडून सांगु लागले की आता अशा लाटा येत राहिल्या तर बोट पालटेल. आम्ही समुद्रात रबरी टायर फेकू त्याला घट्ट धरून ठेवा. पुढची मदत मिळत नाही तोपर्यंत तरंगत रहा. समुद्र इथे तीस-पस्तीस पुरुष खोल आहे. आता मात्र सर्व जण गर्भगळीत झाले. सर्व बायका मुले मोठ्या आवाजात रडू लागली. पुरुषही कासावीस झाले. मी गजानन महाराज, शेगांव यांचा मनात धावा सुरू केला. जाधवला गजानन महाराजांचे नाव घेत राहायला सांगितले. मला श्री गजानन महाराज, शेगांव यांनी ओंकारेश्वर येथे आपल्या सर्व सदस्यांना नर्मदा नदीत बोट बुडत असताना कसं वाचवलं होतं ते लहानपणी आई श्री गजानन महाराज यांची पोथी वाचायची त्यातील एकुन माहीत होते. मी तेवढ्यात ते जाधवला सांगितले. जाधवला ते एकुन त्या परीस्थीतीतही हायसे वाटले. हिंदु असो वा मुस्लिम, प्रत्येक नाची ुऊऊऊऊऊगात एक दैवत असतं. तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेऊ, पण कठिण समयी आपसूकच आपण त्यांची आठवण करतो. तसंही त्या भयाण रात्रीच्या वेळी त्या विशाल समुद्रात मनात विश्वास बळगण्याव्यतिरिक्त अन्य काहीही कोणालाही करण्यासारखे नव्हते. मी, शिवरतन, सुधीर विदर्भातले पण जाधव पश्चिम महाराष्ट्रातील त्यामुळे गजानन महाराजांचे नाव त्याला फारसे माहित नसावे. बुडत्याला काडीचा आधार असं म्हणतात. आता पुढची लाट आली की त्यानंतर कोण कुठे असेल किंवा नसेल ते सांगणं फार अवघड होते. आम्ही एकमेकांचे हात घट्ट पकडून बसुन होतो. मृत्यूची प्रतीक्षा काय असते ते बोटीवरील सगळे जण अनुभवत होते. बोटीवरील कर्मचारी बोटीच्या काठाला जे रबरी टायर बांधून ठेवले होते ते सैल करून ठेवत होते. बाया मुलं यांच्या रडण्याचे आवाज जवळ जवळ बंद झाले होते. तसाही आता जे व्हायचे ते होणारच याची सगळ्यांना खात्री झाली होती. वर जवळपास काळोखच पसरलेला, खाली समुद्राच रुद्र रूप, आणि बोटीवरील अकस्मात आलेली शांतता. बोट आपलं मार्गक्रमण करीतच होती. दुरवर विक्रांत स्थिर उभी असल्याची कल्पना मनाला आधार देत होती. ज्या गोष्टीची वाट कधीच पाहु नये अशा गोष्टींची वाट पाहत आहोत असे वाटु लागले. पुढची लाट! पुढची लाट!! आणि बहुदा त्यानंतर सर्व शांत. असाच थोडा वेळ गेला. काही वेळाने लाट आली, बोट बरीच हल्ली, पण बुडाली नाही. नंतरही लाटा येतच होत्या, बोट हिंदकळत होती, पण बुडाली नाही. थोड्या वेळ लाटा जरी येत असल्या तरी लाटांचा जोर ओसरला होता. बोटीवरील कर्मचारी म्हणाले की आपण थोड्याच वेळात भाऊच्या धक्क्यावर पोहचु. लाटा कमी होत आहेत. आता पुन्हा बोटीवरील वातावरणात भीती कमी झाली असं वाटु लागलं. 

"अरे यार, तुझ्या गजानन महाराजांनी वाचवलं आपल्याला" जाधव मला म्हणाला.

मी कांहीच उत्तर दिले नाही. अजूनही किनारा दिसत नव्हता. थोड्या वेळात भाऊचा धक्का दिसु लागला. बोट पुढे पुढे सरकत होती. शेवटी बोट धक्क्यावर पोहचली. उतरताना सर्वांची एकच घाई. सगळीकडे आनंदी वातावरण होते. मी, जाधव किनाऱ्यावर उत्तरलो. 

पाठोपाठ सुधीर आला. त्यानी पाय ठेवताच "चलो भाई, बच गये" असा सुस्कारा सोडला. 

मी त्याला म्हटलं "सुध्या! तुझा जीव समुद्रात पडता पडता, भांड्यात पडला!"

सगळीकडे खसखस पिकली. हळूहळू सगळे जण किनाऱ्यावर उत्तरले.

आम्ही दादरला आज इतरांपेक्षा उशिरा पोहचलो. ख्वाजा, मापारा, सुनील हे आधीच पोहचले होते. आता उद्या जायचं नव्हतं त्यामुळे सर्वजण निवांत बोलत बसलो. गप्पांच्या ओघात आम्ही दोन दिवस काय जुगाड करतं होतो ते इतरांना सांगितले. आणि त्यामुळे आज कसं जीवावर बेतले होते तेही सांगितले. 

तेव्हा सुनील आणि मापारा यांनी एकदम म्हटलं " सही में ग्रेट हो यार तुम लोग" 

"अरे भाई हमको बताया होता तो ऐसे फसते नहीं थे. आज का तो वार्निग भी था! मालुम है!" मापारा जवळ त्याकाळात एक छोटा ट्रांझीस्टर होता. त्यावरून त्याला समजलं असेल. त्यावेळी एक वाॅकमन लावुन गाणी ऐकणं खूप भारी होतं.

"अरे तुमको बताते तो तुमभी फसते ना! तुम क्या आने वाले नहीं थे क्या?" शिवरतन म्हणाला.

यावर मात्र नंतर एकमत झाले. 

आपल्या प्रत्येकाला वेळ वाचवण्याची एवढी आस असते की त्यासमोर इतर गोष्टींचा विचार केला जात नाही.

हा प्रसंग त्यानंतर आम्ही कोणीही कधी विसरू शकलो नाही.

Comments

Popular posts from this blog

My US Visa Experience